पिंपरी-चिंचवड :
शहरावर मुसळधार पावसामुळे नैसर्गिक संकट कोसळले असताना एका बाजूला अग्निशामक दल, पोलीस, महावितरण, आरोग्य कर्मचारी आणि विविध शासकीय यंत्रणा जीवाची पर्वा न करता मदतकार्य करत होत्या. तर दुसऱ्या बाजूला काही लोकप्रतिनिधी आणि सोशल मीडियावरील ‘रीलस्टार’ मदतीपेक्षा कॅमेऱ्यासमोर दिसण्यात अधिक व्यस्त असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
पूरग्रस्त भागात अग्निशामक दलाने बोटी, दोरखंड, लाइफ जॅकेटच्या सहाय्याने अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धोकादायक ठिकाणचा वीजपुरवठा बंद करून मोठे अपघात टाळले. पोलीसांनी धोकादायक मार्ग बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत ठेवली आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावले. आरोग्य विभागाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून औषध फवारणी केली, तर प्रशासनाने रुग्णवाहिका, निवारा, अन्न आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था केली.
मात्र याच काळात काही लोकप्रतिनिधी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी कॅमेरामनसोबत पूरग्रस्त भागात जाऊन मदतीपेक्षा व्हिडिओ आणि रील तयार करण्यावर अधिक भर दिल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत. काहींनी प्रशासनाच्या मदतकार्याचेच श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा नागरिकांनी व्यक्त केला.
पूरग्रस्तांना प्रत्यक्ष मदत करणाऱ्या अनेक स्वयंसेवकांनी कोणतीही प्रसिद्धी न करता वाहतूक नियोजन, नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविणे तसेच मुक्या प्राण्यांचीही काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले. अशा स्वयंसेवकांचेही नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष मदत महत्त्वाची असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे. संकटाच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या अग्निशामक दल, पोलीस, महावितरण, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचेच खरे कौतुक व्हावे, अशी भावना शहरभरातून व्यक्त होत आहे. तसेच आपत्तीच्या काळात केवळ प्रसिद्धीसाठी फोटोशूट आणि रील बनविणाऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना समाजाने ओळख द्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
