Pimpri-Chinchwad-‘जादा प्रवासी, भरधाव वेग… मृत्यूशी रोजचा प्रवास’; पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदा रिक्षा-व्हॅनचा सुळसुळाट तीन आसनी रिक्षात सहा प्रवासी, व्हॅनमध्ये क्षमतेच्या दुप्पट गर्दी; वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरामध्ये दररोज हजारो नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. शहरातील अनेक मार्गांवर क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरून धावणाऱ्या शेअरिंग रिक्षा आणि खासगी व्हॅनमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नियमांना हरताळ फासून सुरू असलेल्या या बेकायदा प्रवासी वाहतुकीकडे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

औद्योगिक आणि आयटी क्षेत्राचा झपाट्याने विस्तार झाल्याने हिंजवडी, वाकड, मोशी, चिखली, रावेत, किवळे, भोसरी आणि तळवडे परिसरात रोज लाखो नागरिकांची ये-जा असते. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपीएमएलची बससेवा अपुरी पडत आहे. बसची प्रतीक्षा टाळण्यासाठी अनेक नोकरदार, विद्यार्थी आणि महिला नाईलाजाने शेअरिंग रिक्षा आणि खासगी व्हॅनचा आधार घेत आहेत. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत बेकायदा प्रवासी वाहतूक फोफावत आहे.

शहरातील अनेक चौकांमध्ये तीन आसनी रिक्षांमध्ये पाच ते सहा प्रवासी बसवले जातात. काही ठिकाणी चालकाच्या शेजारीही दोन प्रवासी बसवले जातात. आठ ते दहा आसनी खासगी व्हॅनमध्ये १५ ते २० प्रवासी कोंबले जातात. प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ अधिक फेऱ्या आणि अधिक कमाईवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे.

या वाहनांचे चालक भरधाव वेगाने वाहने चालवतात. सिग्नल तोडणे, अचानक कट मारणे, रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालवणे आणि वाहतूक नियमांचे उघड उल्लंघन करणे, असे प्रकार रोज घडत आहेत. हिंजवडी, भोसरी आणि पुणे-नाशिक महामार्गासारख्या व्यस्त मार्गांवर अवजड वाहनांच्या गर्दीत ही वाहने अपघातांना निमंत्रण देत असल्याची भीती व्यक्त होत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक वाहतूक सक्षम असती तर बेकायदा वाहतुकीला एवढे प्रोत्साहन मिळाले नसते. पीएमपीएमएलच्या फेऱ्या वाढविणे, गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त बस सुरू करणे आणि बेकायदा प्रवासी वाहतुकीवर सातत्याने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

“हिंजवडी, वाकड, भोसरी आणि मोशी परिसरात बसेस वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने जादा प्रवासी भरलेल्या रिक्षा आणि व्हॅनमधून प्रवास करावा लागतो. प्रत्येक प्रवास धोकादायक वाटतो. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” अशी संतप्त प्रतिक्रिया नोकरदार व्यक्त करीत आहेत..

शहरात बेकायदा प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढत असताना, वाहतूक पोलीस आणि आरटीओने संयुक्त विशेष मोहीम राबवून अशा वाहनांवर कठोर कारवाई करावी, तसेच सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा सुधारावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कारण, प्रवाशांचा प्रत्येक दिवसाचा प्रवास हा सुरक्षित असावा, मृत्यूशी सामना करणारा नव्हे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *