नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे वेगाने सुरू असलेल्या नाशिकच्या तपोवन परिसरात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. केवडी बन परिसरातील कृषी गो सेवा ट्रस्ट गोशाळेजवळ एका सुटकेसमध्ये आणि गोणीत कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांना तीव्र दुर्गंधी जाणवू लागली. दुर्गंधीचा स्रोत शोधण्यासाठी त्यांनी परिसरात पाहणी केली असता गोशाळेजवळ एक संशयास्पद सुटकेस आणि गोणी पडलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यामधून दुर्गंधी अधिक येत असल्याचे लक्षात आले.
यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सुटकेस आणि गोणीची तपासणी केली असता त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात ही महिला चार ते पाच दिवसांपूर्वी मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुटकेसमध्ये भरून निर्जन ठिकाणी फेकण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, महिलेची ओळख पटविण्यासाठी परिसरातील हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदी, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपोवन परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर कामगार आणि नागरिकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून मृत महिलेची ओळख आणि हत्येमागील कारण शोधण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.
या भीषण घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली असून तपासातून कोणते धक्कादायक तपशील समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
