पिंपरी-चिंचवड :
चाकण परिसरात लाखो रुपयांचा गांजा घेऊन फिरणाऱ्या दोन तस्करांचा डाव अंमली पदार्थ विरोधी पथकाने उधळून लावला. या कारवाईत तब्बल ४१ लाख ९८ हजार रुपये किमतीचा ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गांजासह स्कॉर्पिओ गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
ही कारवाई गुरुवारी (दि. १८ जून) पहाटे चाकण येथील खंडोबा माळ परिसरात करण्यात आली.
या प्रकरणी अनिकेत राजेंद्र बिरंगळ (वय २४, रा. खंडोबामाळ, चाकण, ता. खेड, जि. पुणे) आणि कुशल उद्धव पाठक (वय २४, रा. शिवसाई नगर, सुतारदरा, कोथरूड, पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात अंमली पदार्थ विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करत होते.
पोलीस अंमलदार निखिल वर्पे आणि विजय दौंडकर यांना चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रुबी बेकरीजवळील खंडोबा माळ परिसरात पहाटे सापळा लावला.
यावेळी संशयित स्कॉर्पिओ गाडीची तपासणी करण्यात आली. तपासणीत पोलिसांना मोठा गांजाचा साठा आढळून आला. वजन केले असता तो ८३ किलो ९६० ग्रॅम निघाला. बाजारातील त्याची किंमत जवळपास ४२ लाख रुपये असल्याचे समोर आले.
या कारवाईत पोलिसांनी गांजासोबत १५ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ, ७५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली.
इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा नेमका कुठून आणला होता? तो कोणाला विक्रीसाठी देण्यात येणार होता? या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, अपर आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.
