पीसीएमसीत ‘आपदा मित्र’ स्वयंसेवकांची भरती सुरू; ५० जागांसाठी अर्ज मागवले ​महिना २२ हजार ४५४ रुपये मानधन; पावसाळी हंगामात ४ महिने सेवा देण्याची संधी

पिंपरी :
आगामी पावसाळी हंगामात संभाव्य पूरपरिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे ‘आपदा मित्र स्वयंसेवक’ (PCDRF) पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत एकूण ५० स्वयंसेवकांची निवड केली जाणार असून, त्यांना दरमहा २२ हजार ४५४ रुपये मानधन दिले जाईल, अशी माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

​पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागांवर लक्ष ठेवणे आणि आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदत कार्य उभे करणे यासाठी हे विशेष पथक तैनात केले जाणार आहे. जुलै २०२६ ते ऑक्टोबर २०२६ अशा सुमारे ४ महिन्यांच्या कालावधीसाठी ही तात्पुरती नियुक्ती असेल.
​अर्जासाठी १६ जुलैपर्यंत मुदत
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना २ जुलै ते १६ जुलै २०२६ या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे. निवड झालेल्या स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे तांत्रिक व व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाईल. ‘प्रशिक्षित बना, सज्ज रहा, जीव वाचवा’ या ब्रीदवाक्याला अनुसरून हे स्वयंसेवक पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाचे हात बळकट करतील.

​आपत्तीच्या काळात थेट मैदानावर उतरून समाजसेवा करण्याची आणि प्रशासनासोबत काम करण्याची ही उत्तम संधी असून, पात्र व इच्छुक स्थानिक तरुणांनी यासाठी मोठ्या संख्येने पुढे यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *