आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष नियोजन केले आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या यात्रेसाठी राज्यभरातून तब्बल ५ हजार ५०० विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.
यात्रेदरम्यान भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी महामंडळाने व्यापक तयारी केली आहे. विशेष म्हणजे राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आषाढी वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी आणि भाविक पंढरपूरकडे रवाना होत असतात. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने अतिरिक्त बसेस, विशेष फेऱ्या, वाहतूक व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे.
