Mumbai-महिला उद्योजकतेला चालना; महाराष्ट्रात ‘महिला उद्योजकता स्टार्टअप हब’ उभारणार

मुंबई(mumbai) : राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. या करारामुळे महाराष्ट्रात ‘महिला उद्योजकता स्टार्टअप हब’ स्थापन करण्यास मदत होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या कराराअंतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन तांत्रिक तसेच ज्ञान भागीदार म्हणून कार्य करणार आहेत. महिला उद्योजकांना वित्तपुरवठा, बाजारपेठ उपलब्धता, व्यवसाय विकास आणि मार्गदर्शन यांसह विविध प्रकारचे सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळून राज्यात महिला उद्योजकतेसाठी अधिक पोषक वातावरण निर्माण होईल.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील आणि उदैती फाउंडेशनच्या संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा शर्मा गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या उपक्रमामुळे राज्यातील महिला-नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळणार असून त्यांना उद्योग उभारणी, विस्तार आणि बाजारपेठेशी जोडण्यासाठी आवश्यक पाठबळ उपलब्ध होणार आहे. महिला उद्योजकांच्या नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देत महाराष्ट्रातील उद्योजकता परिसंस्थेला अधिक बळकटी देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *