२७ कोटींचा कर भरूनही पाण्यासाठी संघर्ष; हांडेवाडीतील नागरिकांचा बेमुदत एल्गार”
मूलभूत सुविधांसाठी नागरिकांचा हांडेवाडी चौकात ठिय्या, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आंदोलनात सहभागी
हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ४१ महादेववाडी–उंड्री अंतर्गत अवताडेवाडी–हांडेवाडी परिसरातील नागरिकांनी मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नावर अखेर रस्त्यावर उतरून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. हांडेवाडी चौक येथे आज विविध गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. सिंपली सिटी, मॅजेस्टिक रिदम काऊंटी, ओरिएंट पॅलेस, किंग्स्टन ऑरा, व्यंकटेश क्लासिक, धनश्री आनंद, मावेन्स, फॉर्च्युन इंप्रेस, स्वप्नपूर्ती, सिल्वर स्टोन, फॉर्च्युन सिद्धीप्रिया, लश लाईफ, धनश्री अशियाना, अट्रिया ग्रँडे, मंत्रा सेन्सेस, निको बेमाउन्ट, धनश्री आंगण आणि कॅसलिनो टॉवर्स या सोसायट्यांतील प्रतिनिधींसह १०० हून अधिक महिला व पुरुष नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अपूर्ण ड्रेनेज कामांमुळे साचणारे दूषित पाणी आणि वाढत्या नागरी समस्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. परिसरातील अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी, रस्त्यांवर साचलेले सांडपाणी आणि अनियमित वीजपुरवठा यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, या परिसरातील नागरिकांकडून दरवर्षी तब्बल २७ कोटी रुपयांहून अधिक कर वसूल केला जात असतानाही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. “स्मार्ट सिटी”च्या घोषणा करणाऱ्या पुणे महानगरपालिकेने किमान पाणी, वीज आणि स्वच्छतेसारख्या अत्यावश्यक सुविधा सुरळीत ठेवण्यात पूर्णतः अपयश आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आलेली दिरंगाई आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर काही ठोस मागण्या देखील मांडल्या. हांडेवाडी परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा थांबवण्यासाठी नवीन सब-स्टेशन उभारण्यात यावे, भुजबळ पाणी टाकीमधून नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा तसेच परिसरातील प्रलंबित ड्रेनेजची सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा प्रमुख मागण्या नागरिकांनी केल्या. अनेक वेळा निवेदने देऊन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही प्रश्न कायम राहिल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे नागरिकांनी सांगितले.
या आंदोलनात शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे स्वतः सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी नागरिकांना संबोधित करताना प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली. “अवताडेवाडी–हांडेवाडी परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. नागरिकांच्या हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली असून, जोपर्यंत प्रशासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उद्या हांडेवाडी चौक येथे नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
यावेळी प्रमोद नाना भानगिरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हा संपूर्ण विषय पोहोचवून सोसायटी धारकांना निश्चित न्याय दिला जाईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. या संपूर्ण आंदोलनामध्ये शिवसेना नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, पाणी, वीज, ड्रेनेज आणि इतर मूलभूत नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. “नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी सुरू झालेला हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला।
