रायगड | प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील चावणे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाताळगंगा नदीला आलेल्या महापुरात तब्बल ३ हजार एलपीजी गॅस सिलेंडर वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाताळगंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नदीच्या पाण्याने परिसरातील गोदाम आणि साठवण क्षेत्रात प्रवेश केल्याने मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडर पुराच्या पाण्यात वाहून गेले. नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे सिलेंडर मोठ्या अंतरापर्यंत वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित गॅस कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. वाहून गेलेल्या सिलेंडरचा शोध घेण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. कोणताही अपघात किंवा दुर्घटना घडू नये म्हणून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही गावांचा संपर्क तुटला असून प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
