मुंबई : ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधताना त्यांनी “सत्तापाट सोडून आम्ही संघर्षाची वाट निवडली. जातिवंत शेतकऱ्याने पेरत जायचं असतं, ज्यांच्याकडे पेरण्याची कला नाही ते चोरत गेले,” असे वक्तव्य केले.
माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, पक्षाने सत्तेपेक्षा संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही कार्यकर्त्यांनी हार मानली नाही. नव्या नावाने आणि नव्या चिन्हासह पक्ष पुन्हा उभा राहिला असून जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचा त्यांनी दावा केला.
पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर टीका करताना अंधारे म्हणाल्या, “जातिवंत शेतकरी नेहमी पेरत राहतो. त्याला मेहनतीवर विश्वास असतो. मात्र ज्यांच्याकडे पेरण्याची कला नाही, ते दुसऱ्यांनी तयार केलेल्या गोष्टींवर डोळा ठेवतात. जे लोक पक्ष सोडून गेले, त्यांनी आता पुढे आपले काय होणार याचा विचार करावा.”
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील सहा खासदार वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. हे खासदार शिंदे गटात प्रवेश करू शकतात, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले असून पुढील काही दिवसांत पक्षांतराच्या चर्चांवर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
