कोल्हापूर
कोल्हापूर शहरात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई करत घाणेरड्या आणि निकृष्ट दर्जाच्या पनीरचा मोठा साठा जप्त केला आहे. अचानक करण्यात आलेल्या या छापेमारीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
संशयाच्या आधारे FDA पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात पनीरने भरलेल्या पिशव्या अस्वच्छ आणि असुरक्षित परिस्थितीत साठवलेल्या आढळून आल्या. प्राथमिक तपासणीत हे पनीर निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.
जप्त करण्यात आलेल्या पनीरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकारामुळे कोल्हापूरमधील अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
FDA कडून संबंधितांवर अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
