रिव्हर्स घेतलेल्या कारच्या धडकेत १० वर्षीय बालिकेचा मृत्यू; दोघे जखमी

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बापदेव महाराज ब्रिजवर एका कार चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेजबाबदारपणे कार रिव्हर्स घेतल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला, तर तिचे काका-काकू गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (१९ मे) सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास स्वामी हॉटेलसमोरील हायवे रोडवर घडली.

स्वरा धावडे (१०) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणात अमित बाळकृष्ण धावडे (४७, भिवंडी, ठाणे; मूळ गाव- नांदगाव पाली, सुधागड, रायगड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पजेरो स्पोर्ट कार (एमएच 43/एएन 9567) चालक प्रशांत यशवंत म्हात्रे (४५, वाशी, पेन, रायगड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कार चालकाने कोणतेही पार्किंग सिग्नल न देता किंवा पाठीमागून येणाऱ्या वाहनांना इशारा देण्यासाठी कोणालाही उभे न करता निष्काळजीपणे कार रिव्हर्स घेतली. या कारच्या धडकेत फिर्यादीचा भाऊ जयवंत यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली, तर वहिनी जयश्री यांच्या डोक्याला मार लागून डाव्या पायाला फॅक्चर झाले. तसेच त्यांची पुतणी स्वरा हिच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने ती या अपघातात मृत्युमुखी पडली. या अपघातात फिर्यादीच्या भावाची होंडा ऍक्टीव्हा दुचाकी (एमएच 05/डीटी 2832) आणि आरोपीच्या कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *