पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – गाडी रिव्हर्स घेताना कारला घासल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका पिक-अप चालकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला जखमी करण्यात आले. ही घटना ताथवडे येथे रविवारी (दि. २९) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली.
राहुल देवीदास व्यवहारे (वय ३०, रा. कोंढवा खुर्द, पुणे) यांनी मंगळवारी (दि. ३१ मार्च) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच १४ एलएम ००८१) या कारवरील चालक आणि त्यांचा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी हे त्यांची महिंद्रा बोलेरो पिक-अप स्वागत बिअर शॉपीसमोर वॉशिंग रॅम्पवरून मागे घेत होते. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या क्रेटा कारला पिक-अपचा धक्का लागला.
यामुळे संतप्त झालेल्या कार चालकाने पिक-अपची चावी काढून घेतली आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि कार चालकाच्या मित्राने जवळ असलेली रिकामी बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
