पिंपरी, दि. १० (pimpri chinchwad) – हिंजवडी परिसरात शेअर मार्केटमध्ये चढ्या परताव्याचे आमिष दाखवून एकाची ३५ लाख ६ हजार ५३९ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
ही घटना हिंजवडी फेज १ मधील अशोक मेडोज सोसायटीत घडली.
अंकित एम. डी. माथुर (वय ३९, रा. अशोक मेडोज, हिंजवडी फेज १) यांनी गुरुवारी (दि. ९ एप्रिल) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी राहुल ऊर्फ प्रकाश, मनोज ऊर्फ धर्म, राजेश आणि तीन बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ जुलै २०२५ ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला फोन आणि मेसेजद्वारे संपर्क साधून शेअर बाजारात चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला त्यांच्या डिमॅट खात्याचा वापर करून इंट्राडे ट्रेडिंगद्वारे विश्वास संपादन केला. त्यानंतर ‘अधिक नफा मिळवून देतो’ असे सांगून फिर्यादीकडून पॅनकार्ड आणि आधार कार्डची माहिती घेत बनावट खाते उघडले आणि वेगवेगळ्या खात्यांवर २० लाख ३१० रुपये भरून घेतले.
दरम्यान, आरोपी राजेश याने व्हॉट्सॲप कॉल करून आपण स्टॉक ब्रोकिंग कंपनी चालवत असल्याचे सांगून ५ लाख गुंतवल्यास दिवसाला २५ हजार नफा देण्याचे आमिष दाखवले. असे एकूण ३५ लाख ६ हजार ५३९ रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक करण्यात आली. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
