औंध जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वार्डचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून एका पेशंटने वृद्ध महिला पेशंट वर काचेने वार करून तिला जखमी केले. ही घटना सोमवारी (१३ एप्रिल) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालय, पुणे येथे घडली.
या प्रकरणात कांता मारुती जाधव (६९, लक्ष्मीबाई कॉलनी, ताथवडे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबासाहेब शंकर डोंगरे (४२, औंधगाव, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांता जाधव या औंध रुग्णालयातील आयसीयू वार्डमध्ये उपचार घेत होत्या. त्यांच्या बेडशेजार आरोपी बाबासाहेब डोंगरे हा रुग्ण दाखल होता. पेशंट बाबासाहेब याने फिर्यादीने दरवाजा बंद केल्याचा राग मनात धरला. त्याने रागाच्या भरात दरवाजाची काच फोडली आणि त्या तुटलेल्या काचेने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याजवळ मारून त्यांना जखमी केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
