जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला जिवे मारण्याच्या उद्देशाने मोटारीतून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (१२ एप्रिल) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वासुली येथील अमेझॉन कंपनीच्या गेट समोर घडली.
ऋषिकेश दिलीप कल्हाटकर (२६, कोरेगाव बुद्रुक) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत समर्थ उर्फ सोन्या माणिक तावरे (१८, खालुंब्रे, खेड) यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर बाळू जावळे (३४, कुरकुंडी), नितीन संजय थिटे (२७, रेटवडी, खेड), सौरभ ऊर्फ सोन्या अनिल ढोरे (२८, वरची भांबरवाडी, खेड), अजय भरत गोपाळे (२३, अहिल्यादेवी चौक, खेड), कुणाल प्रशांत चव्हाण (२३, अहिल्यादेवी चौक, खेड), ओमकार दशरथ कोरडे (२४, सांडभोरवाडी, खेड) आणि एका विधीसंघर्षित बालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी लाल रंगाची थार आणि पांढऱ्या रंगाची नेक्सॉन कारमधून एकत्र येत ऋषिकेश कल्हाटकर याला गाठले. जुन्या भांडणाच्या रागातून त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने थार गाडीत घालून त्याचे अपहरण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपहरण केलेला तरुण मिळून आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. उत्तर महाळुंगे पोलीस तपास करत आहेत.
