पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – इंदोरी येथील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये व्यायाम करत असताना बास्केटबॉलच्या रिंगचा लोखंडी खांब अंगावर पडल्याने ५ एप्रिल रोजी एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी इन्स्टिट्यूटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक बाबुराम वर्मा (वय २७, रा. बस्ती, उत्तर प्रदेश) यांनी बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्राचार्य संजित कान्गो (वय ५९, रा. इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे), ग्राऊंड देखभाल करणारे कर्मचारी, स्पोर्ट प्रमुख आणि संस्थेचे व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल बाबुराम वर्मा (वय २०) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ विशाल वर्मा हा ग्राऊंडवर व्यायाम करण्यासाठी गेला होता. तो बास्केटबॉलच्या रिंगला लटकत असताना लोखंडी खांब अचानक तुटून त्याच्या डोक्यात पडला, ज्यामध्ये गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. ग्राऊंडमधील हा खांब जुनाट आणि गंजलेला असतानाही त्याची वेळीच देखभाल न केल्याने हा अपघात घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट विरोधात गुन्हा दाखल
