पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – जुना शाब्दिक वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करत पायावर चाकूने वार केले. ही घटना बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कुरुळी गाव येथील डोंगरे वस्तीत घडली.
संतोष शिवाजी ताजने (वय २४, रा. कुरुळी गाव, ता. खेड, जि. पुणे) यांनी बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर देवानंद धांडे (वय २८, रा. कुरुळी गाव, ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीमध्ये आदल्या रात्री शाब्दिक वाद झाला होता. याचाच राग मनात धरून आरोपीने दारूच्या नशेत फिर्यादीच्या घरासमोर येऊन आरडाओरडा केला. आरोपीने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यावर आणि चाकूने उजव्या पायाच्या पोटरीवर वार करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. दक्षिण महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
शाब्दिक वादातून चाकूने हल्ला; जीवे मारण्याची धमकी
