पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – घराबाहेर जाताना काय बोलला, अशी विचारणा करत शेजाऱ्यांनी एका तरुणाला शिवीगाळ करत दगडाने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. १४ एप्रिल) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मोई गावात घडली.
नंदकुमार भीमराव बिळकेरे (वय ४०, रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) यांनी बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शरण बसप्पा सुभाष अनाकल (वय ३१, मोई, ता. खेड, जि. पुणे), मालश्री अनाकल आणि सिद्धू माडगुळी (रा. मोई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला रस्त्यात थांबवून “दुपारी माझी बहीण आणि पती घराबाहेर जाताना तुम्ही काय बोलला” अशी विचारणा केली. फिर्यादीने आपण काहीच बोललो नाही असे सांगितल्यावर आरोपींनी त्यांना धमकावत शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादीला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने रस्त्यावरील दगड घेऊन फिर्यादीच्या कपाळावर मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. दक्षिण महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
मोई गावात शेजाऱ्याकडून दगडाने मारहाण; तरुण गंभीर जखमी
