पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला जागत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या प्रामाणिकपणाचा आणि तत्परतेचा प्रत्यय दिला आहे. गस्तीवर असताना सापडलेली सोन्याची अंगठी आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट मूळ मालकाचा शोध घेऊन सुपूर्द करत पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
अक्षयतृतीयेला सोने खरेदीची परंपरा आहे. रविवारी मोरवाडी बीट मार्शल ड्युटीवर तैनात असलेले पोलीस अंमलदार घुले आणि बडे हे मैत्री चौक परिसरात गस्त घालत होते. पेट्रोलिंग दरम्यान त्यांना दीप हॉटेलसमोर रस्त्यावर एक पाकीट पडलेले आढळले. त्यावर ‘विशाल ज्वेलर्स’ असे नाव होते.
पोलिसांनी पाकीट उघडून पाहिले असता, त्यात एक सोन्याची अंगठी आणि १६ हजार रुपये किमतीचे ‘शिवकुमार’ या नावाचे बिल मिळून आले. पोलिसांनी वेळ न घालवता बिलावरील माहितीच्या आधारे शोध घेतला असता, हे पाकीट दुर्गाप्रसन्न शिवकुमार वेपा (रा. स्वप्ननगरी हाउसिंग सोसायटी, अजमेरा, पिंपरी) यांचे असल्याचे निष्पन्न झाले.
खात्री पटल्यानंतर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंभार यांच्या हस्ते पाकीट आणि त्यातील सोन्याची अंगठी मूळ मालकाला परत करण्यात आली. आपली हरवलेली मौल्यवान वस्तू सुरक्षित परत मिळाल्याने वेपा यांनी पोलिसांचे आभार मानले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिसरातून आणि सोशल मीडियावरून पोलीस अंमलदार घुले व बडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
—
पोलीस कर्मचारी घुले आणि बडे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा हा पोलीस दलाची मान उंचावणारा आहे. सतर्कता आणि माणुसकीमुळे एका नागरिकाचे नुकसान टळले, याचा आम्हाला अभिमान आहे.
सुहास आव्हाड, वरिष्ठ निरीक्षक, संत तुकाराम नगर पोलीस ठाणे
संत तुकाराम नगर, पिंपरी ः हरविलेली अंगठी मूळ मालकाला परत देताना पोलीस अधिकारी व कर्मचारी.
