पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मॅगझीन चौक ते वाळके मळा जाणाऱ्या रोडवर दिघी येथे करण्यात आली.
उमेश उर्फ अजय रेमालीबाई ब्रम्हणे (वय २०, रा. शास्त्रीनगर, येरवडा, पुणे) असे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार सुधीर डोळस यांनी मंगळवारी (दि. २१) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल इंडस्ट्री ते वाळके मळा रोडवर एक तरुण संशयितपणे थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून उमेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
मॅगझीन चौकात पिस्तूलासह तरुणाला अटक
