शिवरायांवरील वक्तव्यावरून संताप; बागेश्वर बाबांना संभाजी ब्रिगेडचा इशारा “माफी मागा, अन्यथा तीव्र आंदोलन” – इतिहासाच्या विकृतीकरणाचा निषेध

पिंपरी-चिंचवड – छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बागेश्वर बाबांनी केलेल्या विधानाचा निषेध करत संभाजी ब्रिगेडने कठोर भूमिका घेतली आहे. शहराध्यक्ष सतीश काळे यांनी संबंधितांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिक्रिया दिली. शिवराय हे पराक्रम, धैर्य आणि स्वराज्याचे प्रतीक आहेत. त्यांच्याबाबत चुकीचे किंवा दिशाभूल करणारे विधान सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. इतिहास हा अभ्यासाचा विषय आहे. त्यात मनमानी बदल करता येत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून शिवराय घडले. त्यांच्या कार्याचा गौरव कमी करण्याचा कोणताही प्रयत्न हा महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही, असेही सांगण्यात आले. इतिहासाचे विकृतीकरण थांबवावे, अशी मागणी करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडने पुढील काळात आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधितांनी माफी न मागल्यास राज्यभर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *