‘एल-निनो’चा इशारा; पुण्यात पाणी बचतीचा अलर्ट

मान्सूनपूर्व बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश; टंचाई टाळण्यासाठी आतापासून नियोजन

पुणे – यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत असताना पुणे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणी वापरावर नियंत्रण आणि साठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

मान्सूनपूर्व आढावा बैठकीत त्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत महापालिका, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा विभागाने १५ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन केले असले, तरी पुढील उन्हाळा लक्षात घेऊन साठ्याचा वापर करण्यावर भर देण्यात आला.

नदी, नाले आणि कालव्यांमधील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले. धोकादायक इमारतींची तपासणी करून नागरिकांचे स्थलांतर करण्याचेही निर्देश देण्यात आले. अनधिकृत जाहिरात फलक एका महिन्यात हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पावसाळ्यातील पर्यटन व्यवस्थापनासाठी ‘स्लॉट’ पद्धत लागू करण्यावर भर देण्यात आला. आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देत औषधसाठा आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

दरडप्रवण भागात मॉकड्रिल घेण्याचेही निर्देश दिले.
एप्रिलअखेर सर्व कामे पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवावी. नागरिकांनीही पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *