ही घटना पांगरी माथा ते बनकर फाटा दरम्यान घडली. जुन्नरकडून ओतूरच्या दिशेने जाणारा हायवा डंपर आणि ओतूरकडून जुन्नरकडे येणारी होंडा सिटी कार यांच्यात वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा पूर्णतः चुराडा झाला.
या अपघातात अनंता गवारी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यासोबत असलेले विजय खारतोडे यांनाही गंभीर दुखापत झाली, तर तुषार भीमराव कोरडे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि ओतूर येथील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
अनंता गवारी आणि विजय खारतोडे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याकडे हलवण्यात येत होते. मात्र, उपचारासाठी नेत असताना अनंता गवारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातातील डंपर हा मांदारणे येथील ‘विघ्नहर्ता खडी केशर अँड पेवर्स’ कंपनीचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला.
पांगरी माथा परिसरात वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.
ओतूर-जुन्नर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनात शोककळा पसरली.
