पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – तळेगाव स्टेशन परिसरातील एका कॅफेमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी कॅफेचा क्युआर कोड न वापरता स्वतःचा कोड वापरून सहा ते सात लाख रुपये परस्पर आपल्या खात्यावर घेत चोरी केली. हा प्रकार दि. १ जानेवारी २०२४ ते दि. २५ एप्रिल २०२६ या कालावधीत यशवंतनगर येथील दुर्गा कॅफेमध्ये घडला.
या प्रकरणी अविनाश हरिभाऊ बोडके (वय ४५, रा. गहुंजे, मावळ) यांनी शनिवारी (दि. २५ एप्रिल) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल उर्फ अनुज उर्फ विनय कमलेश पटेल (वय २४) आणि विनोद कमलेश पटेल (वय २०, दोन्ही रा. मध्य प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे यशवंतनगर, तळेगाव येथे ‘दुर्गा कॅफे’ आहे. या कॅफेमध्ये दोन्ही आरोपी कामाला आहेत. फिर्यादी बोडके यांनी विश्वासाने क्युआर कोडवर पैसे स्वीकारण्यास सांगितले होते. मात्र, आरोपींनी स्वतःचा वैयक्तिक क्युआर कोड वापरून आणि काही रोख रक्कम असे एकूण अंदाजे सहा ते सात लाख रुपये स्वतःच्या फायद्यासाठी चोरले. ही बाब बोडके यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरोपींना जाब विचारला. मात्र पैसे परत देतो, असे सांगत असल्याने फिर्यादी यांनी उशिरा फिर्याद दिली. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
कामगारांनी बदलला कॅफे मधील क्युआर कोड; सात लाखांची चोरी
