पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथील सोमाटणे फाटा परिसरात एका अल्पवयीन बालकाकडे बेकायदा पिस्तूल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई रविवारी (दि. २६ एप्रिल) रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई सुहास कबिर झेंडे यांनी रविवारी (दि. २६ एप्रिल) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा कायदेशीररीत्या अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीसमोरील मोकळ्या मैदानात हा मुलगा संशयास्पद रितीने वावरत होता. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड मिळून आला. विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
सोमाटणे फाटा येथे ‘अल्पवयीन’ बालकाकडून पिस्तूल जप्त
