भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’! विधान परिषदेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी;

*दिग्गजांना धक्का
संघटननिष्ठांना प्राधान्य, प्रस्थापितांना बाजूला; आगामी निवडणुकांचे समीकरण स्पष्ट*

पिंपरी चिंचवड :– महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेली उमेदवारांची यादी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षाने यावेळी पारंपरिक चेहरे बाजूला ठेवत नव्या आणि संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसला असून, भाजपने आगामी निवडणुकांसाठी वेगळी रणनीती आखल्याचे संकेत दिले आहेत.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने पाच उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. यात सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांची निवड करताना प्रादेशिक समतोल आणि संघटनातील योगदान याला महत्त्व देण्यात आले आहे.

पक्षातील सूत्रांनुसार, यावेळी तरुण आणि कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेले चेहरे पुढे आणण्यावर भर देण्यात आला आहे. अहमदनगर, कोकण आणि विदर्भ या भागांतील प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. विशेषतः विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्या निवडीमुळे स्थानिक पातळीवरील समीकरणांना बळ मिळणार आहे.
या निर्णयामुळे भाजपमध्ये अंतर्गत चर्चांना उधाण आले आहे. ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, या ‘नव्या प्रयोगा’तून भाजपने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *