पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ६० कोटींच्या कथित बोगस उपसूचना प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या घोटाळ्यात सहभागी नगरसेवकांचे पद तात्काळ रद्द करावे, अशी आक्रमक मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. या संदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे निवेदन सादर केले.
या प्रकरणात बोगस उपसूचनांच्या माध्यमातून कोट्यवधींची बिले मंजूर झाल्याचा आरोप आहे. चौकशी अहवालात गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. अनेक उपसूचनांना कायदेशीर मंजुरीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही निधी खर्च करण्यात आला.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी प्रशासनावर थेट प्रश्न उपस्थित केले. “लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार घडला,” असा आरोप करण्यात आला.
या प्रकरणात सहभागी नगरसेवकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. पदाचा गैरवापर केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, असेही नमूद करण्यात आले. संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी, अशीही मागणी आहे.
ठेकेदारांनाही सूट देऊ नये, अशी भूमिका मांडण्यात आली. ज्या ठेकेदारांनी लाभ घेतला, त्यांच्याकडून रक्कम वसूल करावी. त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, महापालिकेच्या लेखा विभागाने यापूर्वीच या प्रकरणाची नोंद घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत दिले आहेत. आता आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
६० कोटींच्या बोगस उपसूचनांचा स्फोट; नगरसेवकांवर कारवाईची मागणी तीव्र ‘आप’चा आयुक्तांकडे धडक मोर्चा; ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी
