पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – जुने भांडण उकरून काढून एका तरुण रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना निगडी येथील दत्त मंदिर परिसरातसोमवारी (दि. 27 एप्रिल) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे.
गणेश लोणकर (वय 25, रा. निगडी गावठाण) आणि निहाल (वय 21, रा. निगडी गावठाण) यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार आकाश खिरडे आणि विकास खिरडे (दोघे रा. चिखली) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व गणेश शिंदे (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी) या रिक्षाचालकाने मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रोजी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात काही वेळापूर्वी भांडण झाले होते. याचाच राग धरून आरोपी आकाश आणि विकास खिरडे यांनी फिर्यादीला पाठीमागून पकडले, निहालने हात धरले आणि गणेश लोणकरने धारदार शस्त्राने अथर्वच्या गालावर, हनुवटीवर आणि गळ्यावर वार केले. यावेळी लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी आरोपीने मध्ये पडाल तर तुम्हालाही मारेन अशी धमकी दिली. निगडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
निगडीत रिक्षाचालकावर खुनी हल्ला
