पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – मोबाईलवर आलेली एक अनोळखी लिंक ओपन करणे बावधन येथील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. आयसीआयसीआय बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून सायबर चोरट्याने तरुणाचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ७ लाख २१ हजार रुपयांवर डल्ला मारला.
याप्रकरणी फिर्यादी विराज विनोद देशपांडे (वय ३७, धंदा नोकरी, रा. टी २, १०५, सोमेट को. ऑप. सो, पौड, भुगाव ता. मुळशी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी मोबाईल क्रमांक ८९५७५१२२४० आणि ९२७८३८१६८२ धारक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० च्या दरम्यान आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलवर संपर्क साधला. आपण आयसीआयसीआय बँकेचे कर्मचारी बोलत असल्याचे सांगून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने फिर्यादीला एक लिंक पाठवून ती ओपन करण्यास भाग पाडले. फिर्यादीने लिंक ओपन करताच आरोपीने त्यांच्या क्रेडिट कार्ड क्रमांकावरून एकूण ७,२१,८५४ रुपयांचे बेकायदेशीर ट्रांजेक्शन करून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.
लिंक ओपन करणे पडले महागात; बँकेचा ‘बनावट’ कर्मचारी बनून तरुणाला ७ लाखांचा गंडा
