पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) –
इंटरनेटवर सर्च इंजिनचा वापर करून अनोळखी क्रमांकांवर विश्वास ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन शॉपिंग ॲप ‘मीशो’वरून खरेदी करताना तांत्रिक अडचण आल्याने गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर शोधणे एका महिलेसाठी आर्थिक फसवणुकीचे कारण ठरले असून, सायबर चोरट्यांनी त्यांना ९५ हजार रुपयांना लुटले आहे.
याप्रकरणी एका महिला फिर्यादीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्हॉट्सॲप नंबर वापरणारा इसम तसेच ज्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत, त्या सर्व खातेधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला २६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास आकुर्डी येथील आपल्या राहत्या घरी मीशो ॲपवरून ऑनलाईन खरेदी करत होती. खरेदी दरम्यान ऑर्डर प्लेस झाली नाही, मात्र त्यांच्या खात्यातून पैसे कट झाले. या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी गुगलवर ‘मीशो’चा हेल्पलाईन नंबर शोधला आणि त्यावर संपर्क साधला.
त्या क्रमांकावरील व्यक्तीने फिर्यादीला एक अज्ञात व्हॉट्सॲप नंबर देऊन त्यावर संपर्क साधण्यास सांगितले. फिर्यादीने त्या नंबरवर कॉल केला असता, समोरच्या व्यक्तीने त्यांना मोबाईल आणि व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये काही तांत्रिक बदल करण्यास सांगितले. आरोपीच्या सांगण्यानुसार कृती करताच फिर्यादीच्या बँक खात्यातून एकूण ९५,००० रुपये परस्पर वळवण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात धाव घेतली. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनसोडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
गुगलवरून नंबर शोधणे पडले महागात; ‘मीशो’ शॉपिंगच्या बहाण्याने महिलेला ९५ हजारांचा गंडा
