चाकण : माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत क्रूर आणि संतापजनक घटना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत समोर आली आहे. खेळणाऱ्या एका ३ वर्षांच्या निष्पाप चिमुरड्यावर शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असतानाच, महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत कौशल्याने तपास करत अल्पवयीन आरोपीला मुसक्या आवळल्या आहेत.
नेमकी काय आहे घटना?
१ मे २०२६ रोजी दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. परिसरात राहणारा एक ३ वर्षांचा मुलगा आपल्या घरासमोर खेळत होता. खेळता खेळता तो अचानक बेपत्ता झाला. पालकांनी परिसरात शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. अखेर पालकांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
बॅगेत आढळला मृतदेह; क्रूरतेचा कळस
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास पथके तैनात केली. परिसरातील बंद खोल्यांची तपासणी केली असता, शेजारील एका खोलीत एका बॅगेमध्ये या मुलाचा मृतदेह आढळून आला. नराधमाने या बालकावर आधी लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर गळा चिरून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. या घटनेने पोलीस प्रशासनही हादरून गेले.
असा लागला आरोपीचा शोध
तपासादरम्यान तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना संशयिताचा सुगावा लागला. संशयित आरोपी हा बिहारचा रहिवासी असून तो स्वतः अल्पवयीन बालक असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
पुणे रेल्वे स्टेशनवर फिल्मी स्टाईल सापळा
आरोपी गुन्हा करून बिहारला पळून जाण्याच्या तयारीत होता. तो पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळताच, तपास पथकाने तेथे सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने या भयानक कृत्याची कबुली दिली आहे.
पोलिसांची तत्परता आणि कारवाई
या संवेदनशील गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, आणि पोलीस उप-आयुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे आणि त्यांच्या पथकाने अवघ्या १२ तासांत आरोपीला पकडून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), २३८ आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
