हिंजवडी (पुणे): हिंजवडी आयटी पार्क परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत संरक्षणाची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकानेच माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार केला आहे. सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या ९ वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला हिंजवडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे आयटी नगरीत पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
बुधवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे दोन लहान मुली सोसायटीच्या प्ले-एरियामध्ये खेळत होत्या. यावेळी तिथे तैनात असलेला सुरक्षारक्षक विजय मधुकर चव्हाण (वय २४, मूळ रा. यवतमाळ) याची नियत फिरली. त्याने दोन्ही मुलींना गोड बोलून आपल्याकडे बोलावून घेतले. मुली जवळ येताच त्याने त्यातील एका चिमुरडीशी लज्जास्पद आणि अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली.चिमुरडीच्या धाडसामुळे फुटले बिंग
सुरक्षारक्षकाच्या या अनपेक्षित कृत्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली, मात्र तिने प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला आणि थेट घर गाठून पालकांना घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. आपल्या पोटच्या गोळ्यासोबत झालेला प्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी क्षणभरही विलंब न करता हिंजवडी पोलीस स्टेशन गाठले.पोलिसांची ‘ॲक्शन मोड’मध्ये कारवाई
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तक्रार प्राप्त होताच मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी सोसायटीत छापा टाकून आरोपी विजय चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्यावर पोक्सो (POCSO) अंतर्गत कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पालकांनो सावधान!
या घटनेमुळे सोसायट्यांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आपल्या मुलांशी दररोज संवाद साधा, त्यांना ‘गुड टच-बॅड टच’ची माहिती द्या आणि सोसायटीतील सुरक्षारक्षकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हिंजवडीत सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीशी अश्लील चाळे: पोलिसांकडून मुसक्या आवळल्या
