जुन्या भांडणाच्‍या कारणावरून शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला

पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका शेतकरी कुटुंबाला काठ्या आणि दगडांनी मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (४ मे) सकाळी ९ वाजेच्या सुमारास मावळ तालुक्यातील बेबड ओव्हळ येथे घडली.
दत्तात्रय भिकाजी सावंत (वय ५७, रा. बेबड ओव्हळ, ता. मावळ, जि. पुणे) यांनी सोमवारी (दि. ४ मे) रोजी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बबन बाबुराव जगताप (वय ७५), किसन बाबुराव जगताप (वय ७३), सुजान बापुराव जगताप (वय ३४), भूषण बबन जगताप (वय ४०) आणि दोन महिला आरोपी (सर्व राहणार बेबड ओव्हळ, ता. मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या वादातून फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी किसनने काठीने कपाळावर तर भूषणने दगडाने डोळ्याच्या बाजूला मारून फिर्यादीला जखमी केले. फिर्यादीची पत्नी आणि मुलगा वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही जमिनीवर पाडून काठीने व हाताने मारहाण करण्यात आली. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *