पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव कारने ट्रेलरला पाठीमागून दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. ४ मे) रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ओझर्डे गावच्या हद्दीत घडली.
सुनीता नारायण भट (वय ५५, रा. विले पार्ले, मुंबई) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सौदागर देविदास गायकवाड (वय ४२), बिपीन प्रजापती (वय २७, रा. म्हाळुंगे, पुणे), एम डी नईम अकबर (वय ५३, रा. नालंदा बिहार), प्रतिक सरवदे (रा. भोसरी, पुणे) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत ट्रेलर चालक प्रविण धन्ना सिंग (वय २८, रा. बेवार, अजमेर, राजस्थान) यांनी सोमवारी (दि. ४ मे) रोजी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक प्रतिक सरवदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण सिंग त्यांचा ट्रेलर (जीजे २७ टीएफ ९६०७) घेऊन मुंबई येथून पुण्याच्या दिशेने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जात होते. ओझर्डे गावच्या हद्दीत आल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या अर्टिगा कारने (एमएच १२ झेडई ५१०२) ट्रेलरला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात सुनिता भट यांचा मृत्यू झाला, तर सौदागर गायकवाड, बिपीन प्रजापती, एम डी नईम अकबर हे गंभीर जखमी झाले आहेत. गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, पाच जण जखमी
