५६ लाखांची सायबर फसवणूक: सायबर सेलची सातासमुद्रापार ‘धडाकेबाज’ कारवाई ​भोसरीतील उद्योजकाचे पैसे अमेरिकेतील बँकेतून मिळवले परत

​पिंपरी-चिंचवड :
भोसरी येथील एका उद्योजकाची ५६ लाख रुपयांची फसवणूक झाली. मात्र, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत ही सर्व रक्कम तक्रारदाराला परत मिळवून दिली आहे. अमेरिकेतील बँकेशी सातत्याने समन्वय राखून केलेली ही कारवाई सायबर गुन्हेगारीच्या जगात अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

​असा घडला प्रकार
भोसरी येथील ‘PHBB VALVES PVT LTD’ या कंपनीचे मालक संजय जाधव यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यांची कंपनी हार्डवेअर क्षेत्रातील काम करते. व्यवसायानिमित्त त्यांचे चीनमधील ‘Wenzhou Artech Machinery Technology’ या कंपनीशी व्यवहार चालतात. हीच संधी साधून अज्ञात सायबर चोरट्याने चीनमधील कंपनीच्या ईमेल आयडीशी साधर्म्य असलेला बनावट ईमेल आयडी तयार केला.

बनावट ईमेलने केला घात
चोरट्याने या बनावट ईमेलवरून जाधव यांना संदेश पाठवला. त्यामध्ये कंपनीचे बँक खाते बदलल्याचे सांगण्यात आले. नवीन खात्यावर तातडीने ५६ लाख रुपये पाठवण्याची सूचना केली. हा ईमेल खरा वाटल्याने जाधव यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी ५६ लाख रुपये सिटीझन बँक (यूएसए) मधील खात्यावर जमा केले.

​असा झाला उलगडा
पैसे पाठवल्यानंतर जाधव यांनी संबंधित चिनी कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. तेव्हा कंपनीने कोणतेही खाते बदलले नसल्याचे स्पष्ट केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी तातडीने ऑनलाइन तक्रार नोंदवली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सातासमुद्रापार पाठपुरावा
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. फसवणुकीची रक्कम अमेरिकेतील बँकेत गेल्याने सुरुवातीला अडचणी येत होत्या. मात्र, पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि त्यांच्या पथकाने अमेरिकेतील संबंधित बँक अधिकारी आणि नोडल ऑफिसर यांच्याशी सतत ईमेलद्वारे संपर्क ठेवला.

​१०० टक्के रक्कम परत
सायबर पोलिसांनी बँकेला सर्व तांत्रिक पुरावे सादर केले. हा व्यवहार फसवणुकीचा असल्याचे पटवून दिले. पोलिसांनी केलेल्या या प्रभावी पाठपुराव्यामुळे अमेरिकेतील बँकेने ती रक्कम फ्रिज केली. आता ही पूर्ण ५६ लाखांची रक्कम तक्रारदार संजय जाधव यांच्या खात्यावर परत जमा झाली आहे.

​या पथकाने केली कामगिरी
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ​या पथकात सायबर पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, रेणुका वाव्हळ, दीपक भोसले, विनायक म्हसकर, सोपान बोधवड आणि माधव आरोटे यांचा समावेश होता.

तक्रारदारांसाठी महत्त्वाचे:
​”कोणत्याही परदेशी कंपनीशी आर्थिक व्यवहार करताना बँक खात्यात बदल झाल्याचा ईमेल आल्यास, अधिकृत फोन नंबरवर संपर्क साधून खात्री केल्याशिवाय पैसे पाठवू नका.”
— सायबर पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *