​दीड वर्षांच्या चिमुकलीसाठी अग्निशमन दलाचे जवान बनले ‘देवदूत’

संत तुकाराम नगरमधील थरार; खेळाच्या नादात दरवाजा झाला बंद
​पिंपरी-चिंचवड :
काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात घडली. खेळता खेळता दीड वर्षांची चिमुकली एका खोलीत अडकली. दरवाजा आतून लॉक झाला. आई-वडिलांचा जीव टांगणीला लागला. मात्र, पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी देवदूतासारखी एन्ट्री घेतली. अत्यंत कौशल्याने अवघ्या काही मिनिटांत दरवाजा उघडून चिमुकल्या जिजाला सुखरूप बाहेर काढले.

​खेळाच्या नादात ओढवले संकट
संत तुकाराम नगर येथील डी. वाय. पाटील कॉलेज परिसरात स्वप्निल घोटकुळे यांचे कुटुंब राहते. मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांची दीड वर्षांची मुलगी जिजा घरात खेळत होती. खेळता खेळता ती एका खोलीत गेली. अचानक दरवाजा जोरात बंद झाला आणि त्याची कडी आतून अडकली. दीड वर्षांच्या जिजाला कडी उघडणे शक्य नव्हते.

आई-वडिलांचा आक्रोश अन् भीतीचे सावट
मुलगी आत अडकल्याचे लक्षात येताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. आई बाहेरून आवाज देत होती. आतून जिजाच्या रडण्याचा आवाज येत होता. वडिलांनी दरवाजा उघडण्याचे सर्व प्रयत्न केले, पण यश आले नाही. काही वेळातच परिसरात ही बातमी पसरली आणि नागरिकांनी तिथे गर्दी केली. चिमुकलीच्या रडण्यामुळे वातावरणात भीती अधिकच वाढली होती.

अग्निशमन दलाची तत्परता
अखेर या घटनेची माहिती पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडला असता तर जोरात आवाज झाला असता. त्यामुळे चिमुकली अधिक घाबरली असती. हे लक्षात घेऊन जवानांनी कल्पकता वापरली. त्यांनी बाहेरच्या खिडकीतून ‘सिलिंग हुक’च्या मदतीने हळुवारपणे दरवाजाची कडी उघडली.

सुटकेचा निश्वास आणि माणुसकीचे दर्शन
दरवाजा उघडताच जिजा रडत बाहेर आली. जवानांनी तिला सुरक्षितरीत्या आईच्या कुशीत सोपवले. मुलीला पाहताच आईला अश्रू अनावर झाले. “आमच्या मुलीला आज दुसरे आयुष्य मिळाले,” अशा भावना घोटकुळे कुटुंबाने व्यक्त केल्या. संकटसमयी धावून आलेल्या अग्निशमन जवानांच्या धाडसाचे आणि माणुसकीचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *