शिरूर तालुक्यातील आंधळगाव फाटा परिसरात सीएनजी पंपाजवळ पिकअप वाहन आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून १२ ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत रवींद्र सखाराम सोनावणे (वय ५४) आणि संगीता सुनील मोरे (वय ३५, जळगाव) यांचा मृत्यू झाला. तर सीमा पाडवी या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन आंधळगाव फाटा येथून चौफुला दिशेने जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने पिकअपच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की वाहनातील काही मजूर रस्त्याच्या कडेला फेकले गेले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
घटनेची माहिती मिळताच मांडवगण फराटा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून खासगी व सरकारी रुग्णालयांत उपचारासाठी हलवले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शिरूर तालुक्यातील आंधळगाव फाटा येथे भीषण अपघात….दोन जण जागीच ठार तर अनेक जण जखमी
