भाजी मंडई, हॉटेल्स आणि बाजारपेठांत सर्रास वापर; नाले तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर
पिंपरी-चिंचवड ः
प्लॅस्टिक बंदीच्या घोषणा आणि मोहिमा सुरू असल्या तरी पिंपरी-चिंचवड शहरात सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर अजूनही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील बाजारपेठा, भाजी मंडई, हॉटेल्स आणि फेरीवाल्यांकडे आजही प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे ‘प्लॅस्टिकमुक्त शहर’ ही संकल्पना केवळ कागदावरच राहिल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
शासनाने प्लॅस्टिक वापरावर निर्बंध लागू करून अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, शहरात त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, निगडी, भोसरी आणि सांगवी परिसरातील बाजारपेठांमध्ये प्लॅस्टिक पिशव्या खुलेआम वापरल्या जात आहेत. किरकोळ विक्रेते आणि फेरीवाले अजूनही ग्राहकांना प्लॅस्टिकमध्येच साहित्य देत असल्याचे दिसून येत आहे.
प्लॅस्टिक कचऱ्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नाले आणि गटारे तुंबण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी प्लॅस्टिक कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग साचत आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट लावणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. पावसाळा तोंडावर आल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुंबलेल्या नाल्यांमुळे पाणी साचण्याचा धोका वाढला आहे.
महापालिकेकडून वेळोवेळी तपासणी मोहीम राबवली जाते. काही ठिकाणी दंडात्मक कारवाईही केली जाते. मात्र, या मोहिमांमध्ये सातत्य नसल्याने त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारवाईनंतर काही दिवस परिस्थिती सुधारते. त्यानंतर पुन्हा प्लॅस्टिकचा वापर सुरू होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
शहरातील पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कापडी आणि कागदी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
महापालिकेकडून व्यापारी आणि नागरिकांना सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात कितपत प्रभावी अंमलबजावणी होते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
