पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – जुन्या वादाचा राग मनात धरून चौघांनी मिळून तिघांना लाकडी दांडके आणि विटांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.ही घटना सोमवारी (दि. ११ मे) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास येलवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी आरोपी तोहीत इनामदार, सार्थक पाडळे, आशिष माने आणि सिद्धार्थ लांघे (सर्व रा. देहूगाव, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सार्थक पाडळे, आशिष माने आणि सिद्धार्थ लांघे यांना पोलिसांनी अटक केली असून तोहीत इनामदार अद्याप फरार आहे. याबाबत एका तरुणाने मंगळवारी (दि. १२ मे) रोजी याबाबत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश ढेरंगे याचा आरोपी प्रशांत जाधव याच्याशी किरकोळ वाद झाला होता. याच रागातून ११ मे रोजी रात्री ११:३० च्या सुमारास हॉटेल इंद्रायणीसमोरील मोकळ्या जागेत आरोपींनी फिर्यादी, आकाश ढेरंगे आणि प्रसाद म्हस्के यांना अडवून मारहाण केली. आरोपींनी लाकडी दांडक्याने मारून फिर्यादीचा हात आणि पाय फॅक्चर केला, तर आकाश ढेरंगेच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. मारहाण करताना आरोपींनी ‘आम्ही येथील भाई आहोत’ असे ओरडत हवेत दांडके फिरवून दहशत निर्माण केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जायभाये या प्रकरणाचा तपास करत आहेत.
किरकोळ वादातून तिघांना बेदम मारहाण; चार जणांवर गुन्हा
