आरटीओ दंड भरण्याच्या बहाण्याने ‘एपीके’ फाईल पाठवून तरुणाला लुटले

पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – आरटीओ चलन भरण्यासाठी आलेली एक लिंक किंवा एपीके फाइल डाऊनलोड करणे हिंजवडीतील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. अज्ञात आरोपीने त्यांच्या बँक खात्यातून तीन लाख ९८ हजार ५०० रुपये लंपास केले आहेत. ​ही घटना ८ मे २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजताच्‍या सुमारास माण (ता. मुळशी) येथील बोडकेवाडी परिसरात घडली.
याप्रकरणी एका पुरुष फिर्यादीने मंगळवारी (दि. १२ मे) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्‍यक्‍तीच्‍या विरोधात गुनहा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी दुपारी साडेतीन वाजताच्‍या सुमारास अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या मोबाइलवर ‘आरटीओ चलन भरण्याची एपीके फाईल’ पाठवली होती. आपल्या गाडीचे कोणतेतरी चलन थकीत असावे, या समजुतीने फिर्यादीने ती फाईल डाऊनलोड केली. फाईल डाऊनलोड होताच फिर्यादीला ओटीपी आला आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तीन लाख ९८ हजार ५०० रुपये कापले गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *