​हरित सेतूच्या कामांची महापौरांकडून थेट रस्त्यावर पाहणी ​दुचाकीवरून निगडी प्राधिकरण परिसराचा दौरा; नागरिकांच्या तक्रारी ऐकत अधिकाऱ्यांना बदलांचे आदेश

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) : हरित सेतू प्रकल्पामुळे निगडी प्राधिकरण परिसरात वाढलेल्या वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि पार्किंग समस्यांची अखेर महापौर रवी लांडगे यांनी प्रत्यक्ष दखल घेतली. गुरुवारी त्यांनी दुचाकीवरून परिसरात फिरत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. विविध चौक, सर्व्हिस रोड आणि गर्दीच्या भागात थांबत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. “नागरिकांवर प्रकल्प लादू नका. जिथे अडचणी आहेत, तिथे तातडीने बदल करा,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
निगडी प्राधिकरण रेसिडन्स फोरमने काही दिवसांपूर्वी हरित सेतू प्रकल्पातील त्रुटींविषयी महापौरांना निवेदन दिले होते. त्यानंतर हा विशेष पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. महापौरांनी दुचाकीवरून रस्त्यांची पाहणी केल्याने प्रत्यक्ष परिस्थिती अधिक स्पष्टपणे समोर आली.
आनंद हॉस्पिटल परिसरातून या दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर मूकबधिर शाळा, भेळ चौक, संभाजी चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर आणि इतर प्रमुख भागांची पाहणी करण्यात आली. नागरिकांनी अरुंद झालेले रस्ते, चुकीच्या पद्धतीने बांधलेले फूटपाथ आणि वाढती वाहतूक कोंडी याबाबत नाराजी व्यक्त केली.
भक्ती-शक्ती चौक ते बिजलीनगर आणि कृष्णा हॉटेल ते अप्पूघर दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर फूटपाथमुळे रस्ते अरुंद झाल्याची तक्रार नागरिकांनी केली. व्यापारी भाग असल्याने पार्किंगचा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगण्यात आले. काही ठिकाणी फूटपाथची रुंदी आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याने वाहतुकीवर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले.
आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात फूटपाथवर अतिक्रमण वाढल्याची तक्रार करण्यात आली. तर बसस्टॉपजवळ बस थांबल्यानंतर इतर वाहनांना मार्ग मिळत नसल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. पीसीसीओई कॉलेज ते गंगानगर मार्गावर स्वतंत्र पार्किंगची मागणीही करण्यात आली.
महापौरांनी अधिकाऱ्यांना वळणांवरील जागा वाढविणे, रस्त्यांची रुंदी कायम ठेवणे आणि वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
“विकासकामे नागरिकांच्या सोयीसाठी असतात. त्यातून लोकांना त्रास होता कामा नये,” असे महापौर रवी लांडगे यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्दे
स्मार्ट पार्किंगची गरज
सिग्नल समन्वय वाढवावा
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण
सायकल ट्रॅकचे नियोजन
झाडांचे संवर्धन आवश्यक
रस्ते दिवे वाढवावेत
अतिक्रमण हटविण्याची मोहीम
बसथांबे सुस्थितीत करावेत
पादचारी सुरक्षेला प्राधान्य
स्थानिकांशी नियमित संवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *