पुणे:प्राचार्यांना ‘पोक्सो’ची भीती दाखवून ७ लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत,‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

पुणे:एका नामांकित महाविद्यालयाच्या ५५ वर्षीय प्राचार्यांना ‘पोक्सो’ (POCSO) आणि विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन ७ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) दोघांना गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शुक्रवारी (१५ मे) ही कारवाई केली. या धक्कादायक प्रकारामुळे पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अजित बडे (पोलीस उपनिरीक्षक) आणि सुदाम तायडे (पोलीस कर्मचारी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात ‘रील स्टार’ महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे आरोपी फरार झाले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वीच या पोलिसांवर निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कॉलेज तरुणीच्या बनावट तक्रार अर्जाचा गैरवापर करून या पोलिसांनी प्राचार्यांना कायदेशीर कारवाईची भीती दाखवली होती आणि अटक टाळण्यासाठी ७ लाख रुपये उकळले होते. मात्र, संबंधित तरुणीने आणि तिच्या पालकांनी या सर्व गैरप्रकाराची माहिती थेट पोलीस आयुक्तांना दिल्यानंतर गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवून या खंडणीखोर पोलिसांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *