पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad crime) – रस्त्याने पायी जात असलेल्या एका व्यक्तीला अडवून त्याच्यावर धारदार कटरने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना दापोडी येथे बुधवारी (दि. १३ मे) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत एका आरोपीला अटक केली आहे.
या गुन्ह्यात ऋषिकेश सुनिल घोरपडे (वय २०, रा. मोहननगर, गोडाऊन चौक, गणेशमंदिराजवळ, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तसेच त्याचा साथीदार गोविंद (पूर्ण नाव माहिती नाही) आणि एक अनोळखी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रवी राजुलिंगम पिल्ले (वय ४३, रा. पवार वस्ती, दापोडी) यांनी शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी रवी पिल्ले हे पायी घरी जात असताना दापोडी कब्रस्तानसमोर आरोपींनी त्यांना गाठले.
आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कटरसारख्या धारदार वस्तूने त्यांच्या कानावर, जबड्यावर व मांडीवर वार करून गंभीर जखमी केले.
त्यानंतर आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून पळून गेले.
पोलीस उपनिरीक्षक जासुद या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
