पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – मद्यप्राशन करून हॉटेलमध्ये शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींना बाहेर जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून हॉटेल मालक महिलेला शिवीगाळ करून तिच्या पतीवर काचेच्या बाटलीने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. १६ मे) रोजी सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील करंजविहीरे येथील साई सिद्धी हॉटेलमध्ये घडली.
या प्रकरणात २८ वर्षीय हॉटेल मालक महिलेने रविवारी (दि. १७ मे) रोजी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शांताराम धोंडीबा नवले (वय ४१, रा. वाहगाव, ता. खेड, जि. पुणे) आणि दिनेश ज्ञानेश्वर जाधव (वय ३९, रा. वाहगाव, ता. खेड, जि. पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये येऊन शिवीगाळ करत होते. फिर्यादी यांनी त्यांना हटकले आणि हॉटेलमधून बाहेर जाण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्यांच्या पतीच्या डोक्यात, मानेवर व कंबरेवर काचेच्या बाटल्या मारून त्यांना गंभीर जखमी केले. उत्तर महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
हॉटेलमधून निघून जाण्यास सांगितल्याने एकास मारहाण
