पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – दारू पिण्यासाठी ५०० रुपये न दिल्याच्या रागातून तीन जणांच्या टोळक्याने एका तरुणाला विटा आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. १८ मे) रोजी मध्यरात्री १२.३० वाजताच्या दरम्यान बोपखेल येथील गणेश मंदिराजवळ घडली.
या प्रकरणात अविनाश सुनील गायकवाड (वय २१, रा. सी.एम.ई. दापोडी) यांनी सोमवारी (दि. १८ मे) रोजी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार उर्फ भैय्या प्रकाश डोंगरे (वय २३, रा. बोपखेल), शेखर कांबळे (वय २६, रा. बोपखेल) आणि करण उर्फ बबलू कांबळे (वय २२) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपी तुषार याने फिर्यादीला दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी करत मारहाण करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या फिर्यादीने ५०० रुपये दिले, मात्र आरोपींनी पुन्हा पैशांची मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यावर तुषारने त्यांना शिवीगाळ करत रस्त्यावर पडलेल्या विटेच्या तुकड्याने डोक्यात व पायावर मारले. आरोपी शेखर याने फिर्यादीच्या पायाच्या अंगठ्यावर फरशीचा तुकडा मारला, तर तिसऱ्या आरोपीने सिमेंटच्या पत्र्याने फिर्यादीच्या पाठीत मारहाण केली. दापोडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर हल्ला
