पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – मोबाइल चार्जर न दिल्याच्या कारणावरून तीन जणांनी एका मेडिकल दुकानदाराला स्टीलच्या कड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १७ मे) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथील प्राईम मेडिको शॉपमध्ये घडली.
या प्रकरणी विजय लादाराम चौधरी (वय २३, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी सोमवारी (दि. १८ मे) रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बबलू म्हस्के (वय ३०, रा. चिखली), आदिनाथ गायकवाड (वय २८, रा. चिखली) आणि नवनाथ वाघमारे (वय ४३, रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या मेडिकलमध्ये असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याकडे मोबाईल चार्जर मागितले. फिर्यादीने चार्जर देण्यास नकार दिल्याने आरोपींना राग आला. त्यापैकी एका आरोपीने हातातील स्टीलच्या कड्याने फिर्यादीच्या नाकावर, चेहऱ्यावर आणि डोक्याच्या मागील बाजूस मारून जखमी केले. इतर दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
मोबाइल चार्जर न दिल्याने मेडिकल दुकानदारावर हल्ला
