पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – काळेवाडी परिसरातील एका घरात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी साठवून ठेवलेला १२ हजार ९०० रुपये किमतीचा २५८ ग्रॅम गांजा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १९) रोजी रात्री अकराच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई कपिलेश कृष्णा इगवे (वय ३६) यांनी मंगळवारी (दि. १९ मे) रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यंकटेश सुरेश नाईक (वय २६, रा. लक्ष्मी निवास, भारत माता चौक, जयहिंद कॉलनी, तिसरा मजला, काळेवाडी, पुणे) या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथकाला काळेवाडी येथील एका घरात अमली पदार्थाचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी व्यंकटेश नाईक याच्या राहत्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता, तेथे पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये बेकायदेशीरपणे विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला २५८ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास काळेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मेटे करत आहेत.
काळेवाडीत घरात साठवलेला २५८ ग्रॅम गांजा जप्त
