माजी महापौर मंगला कदम यांना धक्का; आगामी भूमिकेकडे राजकीय नेत्यांचे लक्ष
पिंपरी-चिंचवड :
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात प्रचंड वादळ उठवणाऱ्या प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्क उद्यान परिसरातील अनधिकृत बांधकामावर अखेर महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने आज हातोडा चालवला. तब्बल ६ जेसीबीच्या साहाय्याने महापालिकेने सुमारे १५०० चौरस मीटर (१६ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त) क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले. मात्र, ज्या बांधकामावरून शहरात मोठे ‘राजकीय नाट्य’ रंगले होते, तेच पाडल्याने आता उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
वादग्रस्त व्हिडिओ आणि राजकीय खळबळ!
या अनधिकृत बांधकामावरून भाजप नगरसेविका योगिता नागरगोजे आणि राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांच्यात सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध रंगले होते. त्यातच या वादादरम्यानचा माजी महापौर मंगला कदम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये कदम थेट भाजप आमदार महेश लांडगे यांना खडे बोल सुनावताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, “माजी आमदार विलास लांडे यांना पाडण्यासाठी मी तुमचे काम केले होते,” अशी उघड कबुली देताना मंगला कदम या व्हिडिओत दिसत आहेत. या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
ज्या बांधकामावरून एवढा मोठा वाद, आरोप-प्रत्यारोप आणि अंतर्गत राजकीय साट्यालोट्याचा उलगडा झाला, तेच अनधिकृत बांधकाम महापालिकेने जमीनदोस्त केल्यामुळे आता “माजी महापौर मंगला कदम पुढे काय भूमिका घेतात?” याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाचा मोठा फौजफाटा तैनात
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई अत्यंत कडक बंदोबस्तात पार पडली. ‘फ’, ‘अ’ आणि ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांचे एकूण ५७ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) जवान, १७ अतिक्रमण पोलीस, ६ जेसीबी मशीन आणि मोठ्या संख्येने मजूर या कारवाईसाठी तैनात होते.
कारवाईच्या वेळी उप आयुक्त अतुल पाटील, प्रशासन अधिकारी महादेव बोरे, उप अभियंता किरण सगर, कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे, वैभव विटकरे तसेच बीट निरीक्षक साक्षी जांभुळकर, निकिता भोईटे, विकास वारभुवन आणि रूपक शिनगारे उपस्थित होते.
अतिक्रमणांविरोधात तडजोड नाही: आयुक्त
”शहरातील सार्वजनिक जागा, उद्याने आणि नागरिकांसाठी राखीव असलेली मोकळी मैदाने अतिक्रमणमुक्त ठेवणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात कोणतीही राजकीय किंवा अन्य तडजोड केली जाणार नाही. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरूच राहतील.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
