​थेरगावात ट्रान्सफॉर्मरला भीषण आग; भरवस्तीत उडाली खळबळ, अग्निशामक दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला

​लक्ष्मणनगर परिसरातील घटना; कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे पुन्हा दुर्घटना, अनेक तास वीजपुरवठा खंडित

थेरगाव :
थेरगावातील लक्ष्मणनगर परिसरात गुरुवारी दुपारी महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. धाईंजे शाळेजवळील भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे लोळ आणि धुराचे मोठे लोट दूरवर दिसत होते. सुदैवाने अग्निशामक दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.

दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. ट्रान्सफॉर्मर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यातूनच आग भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. ट्रान्सफॉर्मरमधून मोठ्या आवाजासह ठिणग्या उडू लागल्या. त्यामुळे परिसरातील नागरिक घराबाहेर पडले.
स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. विद्युत पुरवठा खंडित केल्याची खात्री झाल्यानंतर जवानांनी तत्परतेने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. आग जवळील वस्तीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले.
विशेष म्हणजे, या ठिकाणी यापूर्वीही कचऱ्यामुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही संबंधित विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्रान्सफॉर्मर परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच परिसर नियमित स्वच्छ ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आगीमुळे परिसरातील वीज यंत्रणेचे नुकसान झाले आहे. खबरदारी म्हणून महावितरणकडून परिसराचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. त्यामुळे अनेक घरांमध्ये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत असून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, भरवस्तीत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *